

किणी, पुढारी वृत्तसेवा : खडतर परिस्थितीतूनही केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रयत्नाद्वारे यशाला गवसणी घालता येत असल्याचे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील प्रणाली रमेश पाटील हिने सिद्ध करून दाखवले. तिची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेतून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये निवड झाली
वाठार तर्फ वडगाव येथील प्रणाली पाटीलचे युपीएससी परीक्षेत बाजी
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात क्लासवन अधिकारी म्हणून निवड
खडतर परिस्थितीतूनही यशाला गवसणी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा आज निकाल लागला. वाठार येथील प्रणाली पाटील हिने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रणालीच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील गावोगावी जाऊन संसारोपयोगी वस्तू विकतात. तर आई घरकाम करते. प्रणालीचे प्राथमिक शिक्षण वाठार येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदीर, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल किणी, बारावीपर्यतचे शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झाले. युपीएससीच्या अभ्यासासाठी प्रणालीने पुण्यातील सिध्दी विनायक महाविद्यालयात बी. ए. ची पदवी तर भूगोल विषयातून एम.ए.ची पदवी सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून घेतली.
किणी हायस्कूलमध्ये असताना विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले. आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने दिल्लीला जाऊन क्लास घेणे शक्य नव्हते. पण ध्येय, चिकाटी आणि सातत्य ठेवत तिने यश मिळविले. तिची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये क्लासवन अधिकारी म्हणून निवड झाली. अध्यात्म गुरु नरेंद्राचार्य तसेच चाणक्य मंडळ यांच्या प्रेरणेतून यश मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.