

कोल्हापूर : दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहत मेन रोडवरील किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केली. मालकाला मारहाण, तसेच पत्नीला शिवीगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. गुरुवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. कोयता, एडक्यासह इतर हत्यारे घेऊन सुमारे दहा मिनिटे धुसगूस घालत तरुणांनी दहशत माजवली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.
याप्रकरणी दुकानमालक खेमाराम पुनाराम चौधरी (वय 42) यांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वारे वसाहतीमधील यश माने, ऋत्विक साठे व मंथन (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह इतरांनी मारहाण करून तोडफोड केल्याचे चौधरी यांनी पोलिसांना सांगितले. साठे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
वारे वसाहतीतील एक मुलगा सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 10 रुपयांचे नाणे घेऊन दुकानामध्ये गेला. त्यावेळी मालक चौधरी यांनी 10 रुपयांचे नाणे बाहेर फेकून त्या मुलाला मारहाण केली. संबंधित मुलाचे कुटुंबीय, नातेवाईक जाब विचारण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत माने, साठे, मंथन आदी होते. त्यांनी दुकानात प्रचंड तोडफोड केली. काचेच्या बरण्या फोडल्या. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. चौधरी कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. तरुण गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिस तोडफोड करणार्यांचा शोध घेत होते.