

पेठवडगाव : येथील एसटी स्टँडसमोर इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पुन्हा मगरीसह पिलाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. या खड्ड्यात दोनहून अधिक मगरी असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट वनविभागाला कळवूनही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पेठवडगावच्या एसटी स्टँडसमोर मोकळी जागा आहे. या जागेत इमारत बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यात नेहमी पाणी साचलेले असते. त्यातील एका खड्ड्याच्या काठावर सुमारे तीन फूट लांबीचे मगर व एक पिलू काठावर असल्याचे निदर्शनास आले. हे समजताच पाहणाऱ्यांची संख्या वाढली. ही घटना नगरपालिका प्रशासनास कळविण्यात आली. सुमारे दीड महिन्यांपूर्वीही या ठिकाणी आणखी एका छोट्या पिलाचे दर्शन झाले होते .यामुळे या खड्ड्यात अजून मगरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी कोणताही प्रवाह नसताना जवळ ओढा नाले नसताना या खड्डयात मगरींचा वावर कसा असा प्रश्न नागरिकांना पडला असून मगरी आल्या की कोणी आणून सोडल्या याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. वडगावच्या मध्यवर्ती ठिकाणी मगर आल्याचे वृत्त फोटोसह समाजमाध्यमावर दिवसभर फिरत होते.
फेब्रुवारी महिन्यात पाण्याने भरलेल्या खड्डयाच्या काठावर मगरीचे पिलू आढळून आले होते. याविषयी पालिका प्रशासन व वनविभागाला कळविण्यात आले होते. पण कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या या खड्डयात असणाऱ्या मगरी पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे .
- डॉ.अशोक चौगुले, माजी उपनगराध्यक्ष, पेठवडगाव