Eknath Shinde | ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र’ला विशेष नियोजन प्राधिकरणचा दर्जा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Eknath Shinde |
Eknath Shinde | ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र’ला विशेष नियोजन प्राधिकरणचा दर्जाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबतचा शासन निर्णय 12 मे रोजी काढण्यात आला आहे, यामुळे प्राधिकरणातील 42 गावांच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा मार्ग खुला झाल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला प्रस्तावित गावांचा विरोध असल्याने 16 ऑगस्ट 2017 रोजी शहरालगतच्या 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली होती. या प्राधिकरणाकडून उत्पन्नातूनच निधीची तरतूद असल्याने स्थापनेपासून अपेक्षित विकासकामांना गती मिळाली नाही. व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात मर्यादा आल्या. या 42 गावांतील वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग, मूलभूत सुविधांची गरज, यामुळे प्राधिकरणाकडे स्वतंत्र आणि सक्षम विकास यंत्रणा आवश्यक असल्याची मागणी नरके यांनी करत त्यासाठी पाठपुरावा केला.

या प्राधिकरणाला नाशिक, पुणे आदी विकास प्राधिकरणांच्या धर्तीवर विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यास नगरविकास विभागासह केंद्र शासनाकडून निधी मिळेल, त्यातून या गावांतील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, निवासी आणि व्यावसायिक विकास आदींचे अधिक प्रभावी नियोजन शक्य होईल, असे नरके यांनी 2025 च्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी आणि अर्धा तास चर्चेद्वारे मांडले.

या पार्श्वभूमीवर या प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या निर्णयामुळे कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या विकासाला गती येणार असून, नियोजनबद्ध वाढ, गुंतवणुकीच्या संधी आणि मूलभूत सुविधांच्या विस्तारासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news