Kolhapur Rain: जिल्ह्यात अवकाळीची जोरदार हजेरी

जयसिंगपूरचा आठवडी बाजार विस्कळीत
Kolhapur Rain
जिल्ह्यात अवकाळीची जोरदार हजेरी
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जयसिंगपूरचा आठवडी बाजार, इचलकरंजी, कुरुंदवाडला पावसाने झोडपून काढले. यड्रावला गारांसह पाऊस झाला.

शिरोळ तालुक्याला झोडपले

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जयसिंगपूर शहराच्या आठवडी बाजारावर पावसाने अचानक घाला घातल्याने व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि ग््रााहकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदगाव कोथळी चिंचवड, अर्जुनवाड, कनवाड, शेडशाळ यासह भागातील वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हातकणंगले तालुक्यात हजेरी

कुंभोज : हातकणंगले तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे ऊस, मका, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे. तर हरभरा, ज्वारी, गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली.

इचलकरंजीत वादळी वाऱ्यासह पाऊस

इचलकरंजी : शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. शिवजयंतीच्या मिरवणुका पावसातच सुरू राहिल्या.

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहर व परिसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही क्षणांतच जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शहरासह परिसरात अवकाळीचा थयथयाट सुरू झाला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.

यड्रावला गारांसह मुसळधार पाऊस

यड्राव : यड्रावसह परिसराला रविवारी अवकाळीने चांगलेच झोडपले. गारांसह मुसळधार पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यामुळे दिवसभर उष्म्याने हैराण झालेले नागरिक हवेतील गारव्यामुळे सुखावले.

खोची : खोची, भेंडवडे परिसरात रविवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. काही काळ गारांचा सौम्य मारा झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील चार दिवस परिसरात प्रचंड उष्मा जाणवला. हा पाऊस भरणी केलेल्या ऊस पिकाला पोषक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news