Kolhapur News : उसाचे रसभांड तेजीत, देशात महागाई भडकणार; उदगाव येथे फरांडे महाराजांची भाकणूक

श्री महादेवी मंदिराच्या प्रांगणात भाकणूक; पट्टणकोडोली यात्रेनिमित्त पायी दिंडीचे आगमन
Kolhapur News : उसाचे रसभांड तेजीत, देशात महागाई भडकणार; उदगाव येथे फरांडे महाराजांची भाकणूक
Published on: 
Updated on: 

जयसिंगपूर : "श्री विठ्ठल-बिरदेवाच्या भेटीनंतर मेघवृष्टी होईल, मेंढ्यांना सुख-समाधानात ठेवीन, पालखीत मेंढी मिरवेल, उसाचे रसभांड तेजीत विकले जाईल, मिरची व तंबाखूच्या दरांचा कडकडाट होईल, देशात महागाई भडकेल, रोहिणीचा पाऊस अन् मिरगाची पेर देशात वेळेवर होईल, पुढचे वर्ष सुख-समाधानाचे जाईल, देशात सातत्याने मोठ्या घडामोडी घडतील; त्यामुळे देवाच्या भंडाऱ्यात जो राहील त्याला सुख-समाधान लाभेल," अशी पारंपरिक भाकणूक खोलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांनी केली.

श्री खोलोबा देवस्थान, श्री क्षेत्र अंजणगाव (खे) (ता. माढा, जि. सोलापूर) येथून पट्टणकोडोलीकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याच्या नवव्या दिवशी, रविवारी सायंकाळी उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री महादेवी मंदिराच्या प्रांगणात फरांडे महाराजांची भाकणूक झाली. यावेळी उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पहार घालून महाराजांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना शिधा अर्पण करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अरुण कोळी, ग्रामपंचायतीचे लिपिक सतीश माने यांनी शिधा देऊन स्वागत केले. या प्रसंगी दिलीप माने-सरकार यांच्यासह महादेवी मंदिर परिसरात परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या निमित्ताने खोलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांच्या पायी दिंडीला शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला होता. परंपरेनुसार रविवारी फरांडे महाराजांनी उदगाव येथे महादेवी मंदिराच्या प्रांगणात भाकणूक केली. त्यानंतर दिंडी सोहळा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. सोमवारचा मुक्काम रूई येथे होणार असून, मंगळवारी हा सोहळा पट्टणकोडोली येथे पोहोचेल. दरम्यान, अर्जुनवाड, चिंचवाड, उदगाव, जयसिंगपूर ते चिपरी माळापर्यंत हजारो भाविकांनी फरांडे महाराजांच्या दर्शनासाठी व पूजनासाठी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news