

कोल्हापूर : जिल्ह्यात दोन ठिकाणी दोन विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपविली. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील लीलावती भीमराव जंगली (15) या शाळकरी मुलीने राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. राधानगरीतील तुरंबे येथे आर्यन कृष्णात भोईटे (17) याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.
गडहिंग्लज ः भडगाव येथील लीलावती जंगली या नववीच्या वर्गात शिकणार्या शाळकरी मुलीने दोरीने गळफास लावून जीवन संपविले. लीलावती कुटुंबासह शनिवारी रात्री झोपी गेली होती. वडील भीमराव हे पहाटे साडेचारच्या सुमारास उठले असता मुलगी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोध घेतला असता तिने खोलीत तुळईला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबतची वर्दी भीमराव जंगली यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली.
अर्जुनवाडा : तुरंबे येथे दहावी उत्तीर्ण आर्यन भोईटे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. रविवारी दुपारी ही घटना घडली. आर्यन आई-वडिलांसह तुरंबे येथील भोईटे माळावरील शेतवस्तीवर राहात होता. रविवारी सकाळी त्याचे पालक बाहेरगावी गेले होते. घरी मोठा भाऊ आणि बहीण होते. आर्यन घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या काजूच्या झाडाखाली बसलेला होता. दुपारनंतर पालक घरी परतले असता आर्यन कुठेच दिसेना. शोधाशोध केली असता शेतातील झाडाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. राधानगरी पोलिसांनी पंचनामा करून सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. आर्यन शांत, मनमिळावू आणि अभ्यासू वृत्तीचा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण ते परिवार आहे.