

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा मलकापूर वनपरिक्षेत्रातील माण ता. शाहुवाडी येथे शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. वनरक्षक माण हे वनसेवक यांच्यासोबत जंगल फिरती करत असताना हे दोघे संशयितरित्या फिरताना आढळले. सुभाष केरू चाळके (वय ४२) आणि विलास नानू चाळके (वय ४३, दोघेही रा. मान पैकी ठाणेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींच्या झडतीमध्ये गावठी बनावटीची एक विनापरवाना बंदूक, एक जिवंत काडतूस, एक सुरा, दोन ॲल्युमिनियमचे टोप, एक पळी, एक ताट, दोन मोबाईल, एक हेड टॉर्च आणि मासे मारण्याचे जाळे जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना ८ मार्च रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहूवाडी मलकापूर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असल्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.
तपासासाठी विशेष पथक :
या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंक्षक जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती उज्वला मगदूम, परिमंडळ वनअधिकारी सदानंद जगताप, वनरक्षक स्वाती मेथे, वनरक्षक गुरुबचन हिप्परकर, दिग्विजय पाटील, विठ्ठल खराडे, अक्षय चौगुले आणि वनसेवक किसन पाटील, राजाराम बसरे यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
वन्यजीव शिकार, वनवा किंवा इतर कोणत्याही वन गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास, नजीकच्या वन अधिकाऱ्यांशी किंवा वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.