

कोल्हापूर : आषाढ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या त्र्यंबोली देवीच्या नव्या पाण्याच्या यात्रेची सांगता मंगळवारी झाली. ‘पी ढबाक’ वाद्याच्या निनादात भाविकांनी नवे पाणी अर्पण केले. पावसाच्या सरी असूनही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी पारंपरिक प्रथेनुसार महाभिषेक व कुंभार समाजाच्या जत्रेने यात्राविधीची सांगता होणार आहे.
आषाढ मंगळवारनिमित्त सकाळी देवीची विधिवत शोड्शोपचार पूजा करण्यात आली. वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने देवीला नवीन पाणी अर्पण केले. यावेळी देवीची सिंहवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा सूर्यकांत गुरव, प्रमोद गुरव, श्रीकांत गुरव, सदानंद गुरव व दीपक गुरव यांनी बांधली. आषाढातील परंपरेनुसार दिवसभर घरगुती जत्राही उत्साहात पार पडली. भाविकांनी घरातून आणलेले खारे-गोडे नैवेद्य, आंबील तसेच कोरडा शिधा देवीला अर्पण केला.
आज महाभिषेक
बुधवारी अमावस्या असून, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. प्रथेप्रमाणे सकाळी देवीला महाभिषेक करण्यात येणार असून, सायंकाळी कुंभार समाजाच्या वतीने पारंपरिक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.