प्रा. जयंत नारळीकर प्रथम स्मृतिदिन : विश्वाच्या अथांग गूढाचा शोध घेणारा भारतीय वैज्ञानिक

प्रा. जयंत नारळीकर यांचे अतुलनीय योगदान; जागतिक नकाशावर कोल्हापूरचे नाव कोरणारे चार शास्त्रज्ञ उपेक्षितच
Jayant Narlikar
बहुआयामी खगोलशास्त्रज्ञ : डॉ. जयंत नारळीकरPudhari File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर ः जयंत नारळीकर यांनी अवकाशाचा वेध घेत खगोल भौतिकशास्त्रामध्ये कोल्हापूरचे नाव अजरामर केले. त्यांच्या निधनाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. जयंत नारळीकर हे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गगनभरारी घेणारे आभाळाएवढे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी तरुण पिढीला या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा उपक्रम चिरकाल सुरू राहील, असे प्रयत्न होणे आवश्यक आहे.

कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजातून (महाद्वार) बाहेर येऊन डावीकडे वळण घेतले, की 100 मीटर अंतरावर नारळीकर वाडा म्हणून प्रसिद्ध होता. सरस्वतीचे मुक्त हस्ते दान या घरावर पडले होते. या वाड्यात विष्णुपंत नारळीकर (1908 ते 1991) यांनी आपल्या प्रखर बुद्धीने केंब्रिज विद्यापीठातून रँगलर ही सन्मानाची पदवी संपादन केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठिंब्याने विदेशात शिक्षणाचे अध्ययन लाभलेल्या विष्णुपंतांनी बनारस हिंदू विश्व विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यांचेच पुत्र डॉ. जयंत नारळीकर, ज्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात कोल्हापूरचे नाव आजरामर केले.

प्रा. जयंत नारळीकर यांनी खगोल भौतिकी आणि उच्च गणित यांचा प्रभावी संगम घडवून आणला. विश्वरचनांचे गणितीय मॉडेलिंग अवकाश कालाच्या समीकरणाचा अभ्यास, गुरुत्वीय सिद्धांताची पुनर्मांडणी आणि ‌‘मॅचस्‌‍ प्रिन्सिपल‌’चा कॉस्मॉलॉजीमध्ये वापर या विषयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केेले. त्यांनी दाखविलेली ज्ञानाची दिशा आणि वैज्ञानिक विचारांची परंपरा आजच्या एआयच्या नव्हे तर पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

... तर कोल्हापूरचे नाव समृद्ध अन्‌‍ संपन्न झाले असते

कोल्हापूरने प्रा. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. आर. बी. भोसले, डॉ. एकनाथ वसंत चिटणीस अशी जागतिक क्षितिजावर कोल्हापूरचे नाव कोरणारी रत्ने दिली. आकाशाला गवसणी घालणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या नावे कोल्हापुरात संस्था उभारणे आवश्यक होते. मोठे मार्ग आणि चौकांचे नामकरण करून या रत्नांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारण्यांचा पुढाकार आवश्यक होता. यामुळे कोल्हापूरचे नाव अधिक समृद्ध आणि संपन्न झाले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news