

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ व त्यांनी आपल्या पाच तपांचा प्रदीर्घ पत्रकारितेचा लेखा-जोखा मांडलेले ‘सिंहायन’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. 5) पोलिस परेड ग्राऊंडवर सकाळी 9.30 वाजता संपन्न होत आहे. त्यामुळे कसबा वावडा रोडवरील पोलिस परेड ग्राऊंड रस्त्यावरील 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
डॉ. प्रतापसिंह जाधव हे वयाची 80 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त होणार्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तसेच मंत्रिमंडळातील कॅबिनेट व राज्यमंत्री उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत. हे नागरिक कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी मोटार वाहनांनी येणार असल्याने वाहतुकीस व नागरिकांना पोलिस मुख्यालय परिसरातील रस्त्यावर इतर वाहनांच्या रहदारीमुळे अडथळा निर्माण होऊ नये आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेस धोका पोहोचू नये, यासाठी पोलिस मुख्यालय येथील मैदानलगतच्या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळविणे आवश्यक आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अ) मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारा मार्ग : (कॉन्वायमधील वाहने व शासकीय, आपत्कालीन वाहने वगळून)
पोलिस अधीक्षक कार्यालय चौक ते धैर्यप्रसाद हॉल चौक हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. सर्व वाहनांना या मार्गावर जाण्या-येण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी धैर्यप्रसाद ते अजिंक्यतारा अगर लाईन बाजारमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
तावडे हॉटेल, कोयास्को चौकातून (टेंबलाई उड्डाणपूल) ताराराणी चौक सिग्नल चौकमार्गे धैर्यप्रसाद चौकाकडे जाणारे मार्गावरील सर्व प्रकारचे जड व अवजड वाहनांना ताराराणी सिग्नल चौकात प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आहे.
शियेकडून कसबा बावडा मार्गे ताराराणी चौकाकडे जाणारे जड व अवजड वाहनांना शिये येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणेचा आहे.
नागरिकांना या समारंभास्थळी जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार हे महासैनिक दरबार हॉल हेच आहे. या ठिकाणी वाहने पार्किंग केल्यानंतर पोलिस परेड ग्राऊंड येथे समारंभस्थळी जाण्याकरिता महासैनिक दरबार हॉल ते पोलिस ग्राऊंड असा विशेष थेट मार्ग तयार करण्यात आलेला आहे.