कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड जयघोष..., हलगी, ढोल-ताशा, झांज व लेझीम आदी पारंपरिक पथकांचा दणदणाट, शार्पी लाईट व साऊंड सिस्टीमचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात रविवारी शिवजयंतीच्या मिरवणुका उत्साहात काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू होत्या.
संयुक्त मंगळवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, संयुक्त खंडोबा तालीम, घिसाड गल्ली तरुण मंडळ, संयुक्त गंजी माळ, कनाननगर मित्र मंडळ, पाचगाव, छत्रपती चौक, फाईट ग््रुाप सोमवार पेठ, मराठा वॉरिअर शाहूपुरी, संयुक्त माळवाडी, छत्रपती शिवाजी चौक गडमुडशिंगी, पाटील गल्ली टेंबलाईवाडी, कारवान ग््रुाप, व्हिनस कॉर्नर, कंजारभाट समाज, खंडोबा तालीम, उत्तरेश्वर तालीम, कनाननगर, बी. एल. बॉईज यासह विविध मंडळांचा समावेश होता. मिरवणुकीत मंगळवार पेठेतील शायरन ग््रुापच्या चिमुकल्यांनी छोट्या ढकलगाडीवर शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून मिरवणुकीत सहभाग घेतला.
शनिवारी रात्रीपासूनच अनेक मंडळांच्या साऊंड सिस्टीम असणाऱ्या ट्रॉल्या व मिरवणुकीची वाहने मिरजकर तिकटी परिसरात आणली होती. दुपारपासूनच मिरवणुकीची वाहने मुख्य रस्त्यावर आणल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. दुपारी मिजरकर तिकटी ते बिंदू चौक रस्त्यावर जुना राजावाडा व लक्ष्मीपुरी पोलिसांनी नियमापेक्षा अधिक उंचीवरील असलेल्या साऊंड सिस्टीम उतरवल्या.