Ashadhi Nandwal Dindi | पुईखडीवर भक्तांचा मेळा... रंगला अश्वाचा रिंगणसोहळा

नंदवाळ दिंडीमार्गावर विठुनामाचा गजर : यंदा प्रथमच बाळूमामांच्या मेंढ्याचे रिंगण
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त पुईखडी येथील रिंगण सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी. या सोहळ्याचे ड्रोनद्वारे टिपलेले छायाचित्र.
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त पुईखडी येथील रिंगण सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी. या सोहळ्याचे ड्रोनद्वारे टिपलेले छायाचित्र. (छाया सौजन्य : शुभम अंजणेकर)
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला’ म्हणत भक्तिगीते, अभंग आणि ‘माऊली माऊली’चा जयघोष, फुलांनी सजवलेला ज्ञानेश्वर माऊलींचा रथ, संतांसह विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील भक्तांचा उत्साही सहभाग, कीर्तनात तल्लीन वारकरी अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी (दि. २५) आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी काढण्यात आली. अभंगाचे सूर आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पुईखडीच्या पठारावर रंगलेल्या माऊलींच्या अश्व रिंगण सोहळ्याने या दिंडीत भक्तीच्या सरी बरसल्या. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले.

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले. मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक अभय देशपांडे, पोलिस निरीक्षक किरण लोंढे, नारायण बुधले, पुष्कराज क्षीरसागर, सुहास सोरटे यांच्या हस्ते रथपूजन झाले. त्यानंतर दिंडी नंदवाळच्या दिशेने रवाना झाली. पुईखडी येथे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, सौ. अश्विनी भारुड, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापालिका गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पूजन झाले.

संपूर्ण परिसर विठ्ठलमय

दुपारी दोनच्या सुमारास ज्ञानेश्वरांच्या रथ व पालखीचे पुईखडी येथे आगमन झाले. यावेळी महिला वारकऱ्यांनी फुगड्यांचे फेर धरले. त्यानंतर गोल रिंगण सोहळा रंगला. ऊन आणि वारा असे वातावरण दिंडीमार्गावर होते; तर रिंगण सुरू होताच पावसाची सर आल्याने वेगळाच उत्साह दिसून आला. त्यानंतर भगव्या पताका, अभंग आणि हरिनामाच्या अखंड गजरात दिंडी पुईखडीमार्गे नंदवाळकडे प्रस्थान करताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.

रिंगण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

यंदाच्या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे निवृत्ती चौकात प्रथमच संत बाळूमामांच्या मेंढ्यांचे रिंगण करण्यात आले. हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर प्रथेनुसार खंडोबा मंदिरासमोर अश्वाचा उभे रिंगण सोहळा पार पडला.

क्षणचित्रे...

दिंडीमार्गावर वारकऱ्यांसाठी केळी, लाडू, खिचडी, चहा, ताक वाटप

‘वारीतील शिस्तीप्रमाणे देशातील

शिक्षण व्यवस्थेलाही शिस्त यावी’ :

भाग्यश्री जाधव या तरुणीचे साकडे

नांदणीतील माधुरी हत्तीणीच्या

प्रतिकृतीला पाहण्यासाठी गर्दी

दिंडीत बैलगाड्यांमधून दिले

संतदर्शन व संतवाणी संदेश

चित्रकर्मी, अवनि संस्थेची स्वच्छतेचीही वारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news