

कोल्हापूर : समाजातील अवाढव्य लग्न खर्चाविरोधात कोल्हापूरमधील सकल मराठा समाजानेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हुंडा, दिखाऊपणा, जेवणावळी , महागडी सजावट, प्री- वेडिंग फोटोग्राफी यामुळे होणार्या लग्नातील डामडौलाला लगाम लावण्याचा निर्णय कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सकल मराठा समाजातर्फे निश्चित करण्यात आलेल्या लग्न सोहळा आचारसंहितेला कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत तीच आचारसंहिता कोल्हापुरातील मराठा समाजात होणार्या विवाहसोहळ्यांना लागू करण्यासाठी मोट बांधली आहे.
सध्याच्या काळात लग्न समारंभ हे आर्थिक प्रतिष्ठेचे प्रतीक बनले असून, अनेक कुटुंबांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडत आहे. अनेकांना कर्ज काढून लग्नकार्य साजरे करावे लागते. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरातील लग्नसोहळा साजरा करण्याची पद्धत बदलत आहे. मेहंदी, मुहूर्तमेढ, संगीत, हळदी, लग्न या विधींना इव्हेंटचे स्वरूप आले आहे.
तसेच प्री-वेडिंग फोटोशूटमधील फोटो व व्हिडीओ कार्यालयात स्क्रीनवर दाखवण्याचे पेव फुटले आहे. यावर लाखो, करोडो रुपयांचा खर्च होत आहे. हीच गंभीर स्थिती लक्षात घेऊन, कोल्हापुरातील मराठा समाजाने विवाह संस्कृतीत सामाजिक सुधारणा घडविण्याच्या द़ृष्टीने पुढाकार घेतला आहे. यापुढील काळात गावागावांत जनजागृती मोहीम राबवून समाजात या आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अजूनही हुंडा प्रथेच्या नावाखाली महिलांवर होणारा अत्याचार गंभीर स्वरूपाचा आहे. अनेक प्रकरणांमध्ये मुलींच्या आत्महत्या, अत्याचार अथवा तणावामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मराठा समाजातील गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांनाही समाजाच्या दडपणाखाली अवाढव्य खर्च करावा लागतो. एका मुलीच्या लग्नात सरासरी 8 ते 10 लाखांपर्यंतचा खर्च ओढवतो आणि अनेकदा तो कर्ज काढून केला जातो. परिणामी, विवाहानंतर संपूर्ण कुटुंब कर्जबाजारी होते. कोल्हापुरात गेल्या दीड वर्षात हुंडाबळीच्या 900 तक्रारी दाखल झाल्या आहेत.