

कोल्हापूर : ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांवर पाणीटंचाईचे सावट ओढवले असून दसर्यानंतर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी (दि. ६) उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.
राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी कपातीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी व राधानगरी धरणांत सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला तरी आगामी पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे. सध्या कोल्हापूरला काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून दररोज १८० एमएलडी तर बालिंगा उपसा केंद्रातून ५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर मंगळवार पेठ व लगतच्या परिसराला कळंबा तलावातून नियमित पाणी दिले जाते. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यास शहरातील उपसा आणि वितरणाचे वेळापत्रक पूर्णपणे बदलावे लागणार आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत आहेत. भाविकांसह स्थानिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नवरात्रौत्सव संपेपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरळीत ठेवला जाईल.