

कोल्हापूर : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रगती (प्रगत प्रशासन आणि सहज सुलभ तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे प्राथमिक आरोग्य सेवेची नवी संकल्पना) या राज्यस्तरीय आरोग्य सुधारणा प्रकल्पाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली.
या प्रकल्पांतर्गत कोल्हापुरात ५०० खाटांचे नवे जिल्हा रुग्णालय स्थापन होणार आहे. यासह नांदेड येथेही ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयासह पुणे येथे २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केले जाणार आहे.
या प्रकल्पातून पाच जिल्ह्यात १,६०० खाटांची क्षमता वाढणार आहे. याकरिता १ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४,२५० कोटींची तरतूद केली आहे. त्यात एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे १२,९७५ कोटी कर्ज; तर ३० टक्के म्हणजे ११,२७५ कोटी राज्य शासनाचा हिस्सा राहणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचार
असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात विशेष प्राधान्य दिले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दीर्घकालीन किडनी, फुफ्फुस, स्ट्रोक, मानसिक आरोग्य, डायबेटिक रेटिनोपॅथी, फॅटी लिव्हर, पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पिस सेवांची क्षमता वाढणार आहे. यासह स्तन, गर्भाशय आणि तोंडाच्या कॅन्सरची तपासणी, निदान व सुविधाही सक्षम केली जाणार आहे. याकरिता मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.
जिल्ह्याला पुन्हा जिल्हा रुग्णालय मिळणार
सीपीआर रुग्णालय हे जिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत होते. ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (मेडिकल कॉलेज) २००७ मध्ये वर्ग झाल्यानंतर त्याचे सर्वोपचार रुग्णालय झाले. यामुळे गेल्या १९ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा होती, ती आता संपणार आहे.