

कोल्हापूर : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानसेवेसाठी कंपनीच्या तज्ज्ञ पथकाकडून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाहणी केली जाणार आहे. या सेवेसाठी कोल्हापूर विमानतळावर एअरबस विमान उतरणार आहे.
कोल्हापूर-दिल्ली या मार्गावर इंडिगो कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे. त्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यापूर्वी गतवर्षी कंपनीच्या पथकाने पाहणी केली होती, तो अहवाल सकारात्मक असल्याने पुढील टप्प्यासाठी तज्ज्ञांचे पथक कोल्हापुरात येत आहे. एअरबस उतरवण्यासाठी आवश्यक सुरक्षितता आणि सुविधांची पाहणी होणार असून, त्याचा अहवाल दिल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत ही सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले.
कोल्हापूर-दिल्ली मार्गावर विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने आहे. दिल्लीला जाण्यासाठी सध्या पुणे, बेळगावचा पर्याय आहे; अन्यथा कनेक्टिंग फ्लाईट घ्यावी लागते. आता या मार्गावर कोल्हापुरातून थेट सेवा मिळेल, त्याचा परिसरातील जिल्ह्यांनाही फायदा होईल, यासह कोल्हापूर देशाच्या राजधानीसोबत हवाईमार्गे थेट जोडले जाईल.
कंपनीकडून एअरबस विमानाची चाचणी घेतली जाणार आहे, तर विमानतळावर बसवलेल्या ‘डीव्हीओआर डीएमई’ या प्रणालीसाठी ‘फ्लाईट प्रोसिजर टेस्टिंग’ प्राधिकरणाला करायचे आहे. कंपनीची चाचणी आणि ‘फ्लाईट प्रोजिसर टेस्टिंग’ हे एकाच वेळी व्हावे, याकरिता प्राधिकरण आग्रही आहे. तसे कंपनीला कळवले आहे. सध्या वापरात असलेल्या ‘आरएनपी’ ही सॅटेलाईट बेस सिस्टीम सर्वच विमानांत असतेच, असे नाही. यामुळे अत्याधुनिक ‘डीव्हीओआर’ प्रणालीचा वापर होणार आहे.
कोल्हापूर विमानतळावरून कोणत्या प्रकारच्या (जातींची) विमानांचे ऑपरेशन करता येते, याबाबतची कागदपत्रे विमानतळ प्राधिकरणाकडून कंपनीला सोमवारी देण्यात आली. दरम्यान, एअरबससाठी आवश्यक सुविधांची पूर्तता एक-दीड महिन्यतच पूर्ण केली जाणार आहे. यामुळे नोव्हेंबरपासून ही विमानसेवा सुरू होईल, अशी शक्यता वाढली आहे.