

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा : कालव्यावर बसवलेल्या सहा विद्युत पंपांची चोरी करून कोल्हापुरात विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तिघा चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दहा दिवसांत चोरट्यांना पकडून संबंधित शेतकऱ्यांना मोटरी परत मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या दूधगंगा उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंप बसविलेले आहेत. नदीपासून लांब असलेल्या या परिसरामध्ये बहुतांश शेतकरी या कालव्यातून पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देतात.शनिवार दि.९ मार्च रोजी रात्री पांडुरंग शंकर शिंदे(५एचपी) श्रीमती भागीरथी दिनकर भोगटे( ५ एचपी), भिकाजी बळीराम कोकाटे (३ एचपी), विलास विष्णू कोकाटे (५ एचपी),रघुनाथ गुंडू पाटील(५ एचपी),कै .बाबासो जोती कोकाटे (५ एचपी)या सहा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांची एकाच रात्री चोरी झाली होती. त्यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
आज (दि २०) शेतीसाठी वापरतात असलेल्या इलेक्ट्रिक मोटरी टेंपोमधून विक्रीसाठी घेऊन तीन चोरटे कळंबा , संभाजीनगर, हॉकी स्टेडियम मार्गे जाणार आहेत याची खबर जुना राजवाडा पोलिसांना मिळाली.त्यानुसार निर्माण चौक व हॉकी स्टेडियम येथे पोलिसांनी सकाळपासून सापळा लावला होता.दुपारी ४:३० च्या सुमारास टेंपो चालक व दोन व्यक्ती टेंपोमधून येत असल्याचे दिसून आले.टेंपोमध्ये सहा इलेक्ट्रिक मोटर आढळून आल्या.मोटरीच्या मालकी हक्काची चौकशी करता समाधानकारक उत्तर देता आले नाही.अधिक चौकशी करता कसबा वाळवे गावच्या कालव्यावर बसवण्यात आलेल्या मोटरी चोरी करून आज विक्री करण्यासाठी कोल्हापुरात घेऊन आलो असल्याचे कबूल केले.चोरीच्या दाखल गुन्ह्याची खात्री करून अनिकेत आप्पासो शिंदे, ( वय-१९),शुभम सुनील चौगले (वय-२६) दोघेही रा.निगवे खालसा व प्रथमेश शहाजी मांडवकर,रा.वाळवे खुर्द (वय-२२) या तिघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून सहा मोटरी(अंदाजे १५०००० रुपये)व मोटर चोरण्यासाठी वापरलेला टेंपो एम एच-४६-बी एफ १४४४(अंदाजे ३५०००० रुपये)असा एकूण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत जुना राजवाडा पोलिस निरीक्षक संजीव झाडे,गुन्हे शोध पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार गजानन गुरव,सागर डोंगरे, सतिश बांबरे,अमर पाटील, प्रशांत पांडव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, पोलीस नाईक संदीप माने, योगेश गोसावी,गौरव शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
अनेक छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेल्या या विभागात अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत.मटका राजरोस सुरू आहे.गांजासारख्या नशील्या पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री होत असून अनेक तरुण या विळख्यात सापडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.याला वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलिसांची दबंग कामगिरी व्हायला हवी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे.