कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या योजनेला वीजपुरवठा करणार्या पुईखडी सबस्टेशनमध्ये अचानक झालेल्या बिघाडामुळे जलवाहिनीवरील कंट्रोल व्हॉल्व्ह खराब झाले असून, हे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.
महावितरण कंपनीकडून पुईखडी 220 के.व्ही.ए. सबस्टेशनमधील दुरुस्तीची कामे करताना सोमवारी विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुख्य पाईपलाईनवरील कंट्रोल व्हॉल्व्ह खराब झाले. हे व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार दुपारपासून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणी पुरवठा खंडित केला आहे. तत्काळ हे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले असून मंगळवारी सकाळपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सकाळपर्यंत हे काम पुर्ण झाले तर पाणीपुरवठा सुरू होऊन सायंकाळपर्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होईल. बुधवारी मात्र नियमितपणे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी केले आहे.