

कळे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळे (ता. पन्हाळा) येथे टेम्पो ट्रॅव्हलर व मोटारसायकलच्या अपघातामध्ये जखमी झालेल्या युवकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. प्रणव सर्जेराव पाटील (वय 18, रा. सुळे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव असून, हा अपघात मंगळवारी (दि. 21) सकाळी अकराच्या सुमारास घडला.
कळे येथील टेम्पो ट्रॅव्हलर मालक विजय गजानन कोळेकर हे गाडी सर्व्हिसिंग करून घरी निघाले होते. ते कळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानी जवळून आत गावात वळत असताना समोरून मोटारसायकलवरून दोघेजण येत होते. वळण घेत असलेली ट्रॅव्हलर बघून मोटारसायकल खाली घसरली व प्रणव खाली पडून टेम्पोच्या मागील चाकात सापडला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने त्याच ट्रॅव्हलरने कोल्हापूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातातील मोटारसायकल चालकही (नाव समजू शकलेले नाही) जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रणवच्या मागे आई, वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.