

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार, ही चर्चा सुरू असतानाच देवस्थानच्या अध्यक्षपदाचे बिगुल कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच वाजणार, हे निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ स्तरावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सारीपाटावर भाजपचे किती उमेदवार निवडून येणार, त्यावर देवस्थानच्या अध्यक्षपदाचे नाव ठरणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील भाजपच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली असून, महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली. एप्रिल 2021 मध्ये देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. त्यानंतर समिती सदस्यांसह अध्यक्षांची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर देवस्थान समिती व अध्यक्ष निवड होईल, अशी शक्यता होती; मात्र तीही मावळली. अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून लवकरच पहिल्या टप्प्यातील विकासकामांना सुरुवात होणार आहे. तसेच देवस्थानच्या जमिनींबाबतही अनेक निर्णय प्रलंबित आहेत. मंदिरातील सुविधासंदर्भात अनेक प्रस्तावांना संथगती आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सध्या अध्यक्षपदाचा कार्यभार आहे.
दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांच्या अध्यक्षपदांपैकी कोल्हापूर आणि शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी भाजपने आग्रह धरला आहे. यानुसार ही दोन्ही पदे भाजपला मिळाली आहेत. विधानसभा मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा एकदा देवस्थान समिती व अध्यक्षपदावर कोणाचे नाव कोरले जाणार, याची चर्चा सुरू होती. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता महापालिका निवडणुकीचा गुलाल उधळल्यानंतरच देवस्थानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घंटा वाजणार आहे.