

कोल्हापूर ः त्र्यंबोलीदेवीच्या आषाढी यात्रेअंतर्गत नवे पाणी देवीला वाहण्यासाठी घेऊन जाताना जवाहरनगर येथे दोन गटांत राडा झाला. तलवार, चाकू, काठ्यांनी एकमेकांना जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी अमोल महादेव भास्कर याच्यासह दहा जणांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दि. 15 रोजी दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा चौघांना अटक करण्यात आली.
सागर दिनकर सोनवणे (वय 34, रा. जुना कंदलगाव नाका) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल भास्कर, पिंटू भास्कर, ओम भास्कर, प्रथमेश सोनवणे, रोहीत चव्हाण, प्रतीक थोरात (सर्व रा. जवाहरनगर), तर प्रथमेश सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय सुरेश कदम (वय 25), सागर दिनकर सोनवणे, अजय सुरेश कदम (23), सुरेश शंकर कदम (46, रा. जवाहरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी 4 च्या सुमारास जवाहरनगर येथून टेंबलाई यात्रेनिमित्त लावलेली म्युझिक सिस्टीम बघण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अमोल भास्कर हा मिरवणुकीमध्ये व रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांच्या अंगावर विनाकारण पाणी मारत होता. त्याला पाणी मारू नको असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने हॉकी स्टीक तसेच इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. प्रथमेश सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संयुक्त जवाहरनगर मंडळाच्या कार्यक्रमात पेपर ब्लास्ट मशिन भाड्याने लावले होते. त्यावेळी कदम, सागर सोनवणे व इतरांनी पेपर ब्लास्ट मशिन उडविण्यासाठी दिले नाही, याचा राग मनात धरून प्लास्टिकच्या पाईपसह चाकू, तलवारीने मारहाण केली.