कोल्हापूर : 'केशवराव' कधी उभे राहणार ते सांगा

तांत्रिक मुद्यांवरून रंगकर्मी आक्रमक; नाट्यगृह पुनर्बाधणी सुकाणू समितीवर प्रश्नांची सरबत्ती
Kolhapur News
कोल्हापूर : 'केशवराव' कधी उभे राहणार ते सांगाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा केशवराव नाट्यगृह कधी उभे राहणार ते सांगा, अशी आक्रमक भूमिका घेत कोल्हापुरातील रंगकर्मीनी सुकाणू समितीच्या इंद्रजित नागेशकर व अमरजा निंबाळकर या सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. केशवराव नाट्यगृह जळीतप्रश्नी व पुनर्बाधणीबाबत रविवारी खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू पॅलेस येथे बैठक झाली. या बैठकीत नाट्यगृहाच्या तांत्रिक मुद्द्यांवर वादळी चर्चा झाली. नाट्यगृह उभारणीच्या कामात सकारात्मक गती घेतली नाही तर आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा इशारा रंगकर्मीनी दिला. (Kolhapur News)

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात होउन दीड महिना उलटला तरी अजून प्रशासकीय पातळीवर कागद रंगवले जात आहेत. प्राथमिक पाहणी अहवालावरच कार्यवाहीचे भिजत घोंगडे पडले आहे. मलबा काढल्याशिवाय अंतिम स्ट्रक्चरल ऑडिट होणार नसल्याने नाट्यगृह पुनर्बाधणीच्या कामाला दिरंगाई होत आहे. केशवराव नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीचे कंत्राट कुणाला मिळणार यामध्ये आम्हाला स्वारस्य नसून नाट्यगृह जसे होते तसे उभारणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याची मागणी रंगकर्मीनी केली.

आगीच्या घटनेनंतर नाट्यगृहाच्या पाहणी अहवालात नाट्यगृह ४२ टक्के बाधित झाले असून ५८ टक्के सुस्थितीत असल्याची नोंद मुंबई येथील तज्ज्ञांनी केली आहे. याकडे रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनी लक्ष वेधले असता आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी ही नोंद चुकीची असल्याचे सांगितले, तर अजून अंतिम स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल केला नसल्याचे इंद्रजित नागेशकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जर चर्चेचा प्रत्येक मुद्दा स्ट्रक्चरल ऑडिटवर येऊन थांबणार असेल तर नाट्यगृहाच्या पुनबांधणीला होणाऱ्या दिरंगाईची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सुनील घोरपडे यांनी केला.

नाट्यगृहाचा मूळ ढाचा न हलवता पुनर्बाधणी करता येणे शक्य आहे की नाट्यगृह पूर्णपणे जमीनदोस्त करून बांधायचे या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक असून नाट्यगृहाची प्रक्रिया आचारसंहितेत अडकली तर हे काम पुढचे दोन वर्षे सुरू होणार नाही आणि यामध्ये रंगकर्मीच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, याचा विचार प्रशासनाने गांभीयनि करावा, अशी मागणी रंगकर्मी घोरपडे यांनी केली. भरत दैनी म्हणाले, कोल्हापूरला महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा म्हणून प्रगतिपथावर आणायचे असेल तर नाट्यगृह उभारणीला वेग आला पाहिजे. आनंद काळे यांनी, नाट्यगृहाच्या कामात वाढत असलेल्या तांत्रिक अडथळ्यांवर तातडीने उपाय शोधण्याचे मत व्यक्त केले.

खा. शाहू महाराज म्हणाले, कलाकारांची भावना तळमळीची आहे. नाट्यगृह पुनर्बाधणीबाबत प्रशासन आणि रंगकर्मी यांच्यातील समन्वयातूनच काम केले जाईल. येत्या दोन वर्षांत नाट्यगृह पुन्हा उभे राहील यासाठी प्रयत्न करणार असून या कामात तडजोड केली जाणार नाही. बैठकीला मधुरिमाराजे, व्ही. बी. पाटील. विष्णू जोशीलकर, रवीकिशोर माने, उदय गायकवाड, ऋतुराज इंगळे, भारती पोवार, चंदा बेलेकर यांच्यासह मिलिंद अष्टेकर, धनंजय पाटील, किरण चव्हाण, सागर वासुदेवन आदींसह रंगकर्मी, आर्किटेक्ट, अभियंता, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या' बैठकीला खा. शाहू महाराजांना निमंत्रण नव्हते

नाट्यगृहाच्या पाहणी अहवालावर आधारित सादर केलेल्या प्रेझेंटेशनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला खा. शाहू महाराज यांना निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच रंगकर्मीना आवश्यक असलेल्या सुविधांचे मतही घेतले नाही. नाट्यगृहाच्या कामकाजात अशा प्रकारची वागणूक योग्य नसल्याचे रंगकर्मी म्हणाले.

आज पुन्हा बैठक

केशवराव नाट्यगृह पुनर्बाधणी कामाचा विषय तडीस नेण्यासाठी सोमवार, दि. २३ रोजी खा. शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत तातडीने बैठक घेण्याची मागणी रंगकर्मीनी केली. जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचे आश्वासन शाहू महाराज यांनी यावेळी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news