Tawade Hotel Kolhapur Arch | तावडे हॉटेलनजीकची स्वागत कमान उतरवली

कोल्हापूरकरांसह पर्यटकांचा 28 वर्षांचा साक्षीदार जमीनदोस्त
Tawade Hotel Kolhapur Arch
कोल्हापूर : तावडे हॉटेल येथील स्वागत कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली.
Published on
Updated on

कोल्हापूर : गेली अठ्ठावीस वर्षे कोल्हापूरकरांसह पर्यटकांना कोल्हापुरात आल्याची आठवण करून देणारी आणि कोल्हापूरची ओळख बनलेली तावडे हॉटेल येथील स्वागत कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली. आता लवकरच आकर्षक कमान उभारण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी रात्रीपासून सकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक उचगावमार्गे वळवण्यात आली होती.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात प्रवेश करताना स्वागतासाठी 28 वर्षांपूर्वी कमान उभारण्यात आली; पण गेल्या काही वर्षांत या कमानीची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणचा कमानीचा भाग ढासळत चालला होता. अपघात घडू नये, यासाठी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली. गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून काम सुरू करण्यात आले. दोन पोकलेन, 6 डंपर, ब—ेकर आणि साहित्य घेऊन रात्री दहा वाजता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर साडेदहा वाजता स्वागत कमानीवरील फलक काढण्यात आला आणि 10.45 वाजता प्रत्यक्ष कमान पाडण्यास सुरुवात झाली. सुमारे दोन तासांनंतर कमान पूर्ण पाडण्यात आली आणि डंपरच्या साहाय्याने मलबा इतरत्र हलविण्यात आला. यावेळी शहरातून बाहेर जाणारी आणि शहरात येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. कारवाईत अडथळा येत असल्याने पोलिसांनी त्यांना बाजूला हटवले.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णात पाटील, जलअभियंता हर्षजित घाटगे, शहर अभियंता रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता निवास पोवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, कमान पाडण्याचे काम सुरू असल्याने तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक या कालावधीसाठी उचगावमार्गे, तर कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेलमार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शियेमार्गे वळवण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news