kolhapur | सावधान... स्वाईन फ्लू, मलेरिया वाढतोय!

कोल्हापुरात तीन रुग्णांना बाधा, मलेरियाचे रुग्णही आढळले; नागरिकांची सतर्कता आवश्यक
Swine Flu |
kolhapur | सावधान... स्वाईन फ्लू, मलेरिया वाढतोय!
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्‍हापूर : कडाक्याचा उन्हाळा संपून पावसाच्या सरी कोसळू लागल्या, की बदलणार्‍या तापमानामध्ये संसर्ग रोगाचे विषाणू उभारी घेतात. तसे यंदा महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने आपले आगमन केले आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता या विषाणूने कोल्हापुरातही हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मलेरियाने आपले तोंड वर काढले आहे.

कोल्हापुरातील एका लॅबमध्‍ये तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय, मलेरियाचे रुग्ण सापडू लागले आहेत, अशी माहिती डॉ. आर. एस. पाटील यांनी दिली. स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये सापडले आहेत. यामुळे कोल्हापुरात किती रुग्णांना याची बाधा झाली आहे, याची अद्याप एकत्रित नोंद मिळत नाही. तथापि, नागरिकांनी लक्षणांची चाहूल लागताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे मत डॉ. अभयदीप आरगे यांनी व्यक्त केले.

एन्फ्ल्युएन्झा-ए (एच-1 एन-1) या विषाणूंपासून स्वाईन

फ्लूचा संसर्ग होतो. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता असते. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला रुग्ण खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे सदरचा विषाणू संपर्कात आलेल्या इतर लोकांना श्वसनमार्गावद्वारे त्याची लागण करतो. लागण झालेल्या व्यक्तीपासून १ ते ७ दिवसांत विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात होते. यंदा लांबलेला उन्हाळा आणि अचानक सुरू झालेला पाऊस स्वाईन फ्लूच्या पथ्थ्यावर पडला आहे. स्वाईन फ्लू बरोबर मलेरियानेही डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात मलेरियाच्या रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली गेला होता आणि डेंग्यूने डासांमुळे उद्भवणार्‍या साथीचा कब्जा घेतला होता. आता घाणीच्या साम्राज्याने पुन्हा एकदा मलेरियाच्या एडिस इजिप्ती या डासाच्या प्रजातींना पायघड्या घातल्या आहेत. स्वाईन फ्ल्यू हा वेळीच उपचार न घेतल्याने गंभीर वळणावर जाणारा आजार आहे. यामुळे या आजाराला अटकाव करण्यासाठी आजाराची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहेे, असा सल्‍ला डॉ. आरगे यांनी दिला आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे

अचानक ताप, खोकला, घसा दुखणे, नाक वाहणे, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास अथवा निमोनिया

जास्त धोका कोणाला? : गर्भवती महिला, पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, हृदयविकार, दमा, मूत्रपिंडाचे आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण.

प्रतिबंधात्मक उपाय : हात वारंवार धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, ताप किंवा खोकला असल्यास घरी विश्रांती घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकर तपासणी व आवश्यक असल्यास अँटिव्हायरल औषधे सुरू करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news