

जयसिंगपूर : ऊस दराच्या तोडग्यासाठी आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे ऊस दराचे आंदोलन पेटले आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊस दरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला तरी कर्नाटकात सुरू झालेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण आहे. जिल्ह्यात उसाची पळवापळवी टाळण्यासाठी कारखान्यांनी मुदतीपूर्वीच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे.
कारखानदारांकडून केवळ एफआरपीची रक्कम जाहीर केली जात असल्याने शिवाय गत हंगामातील जादाची बिले देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उसाची वाहतूक करणार्या तीन वाहनांना अडवून अनोळखी आंदोलकांनी पेटवून दिली. यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वी ऊस दराचा प्रश्न मार्गी लावून हंगाम सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.