

राशिवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 21 साखर कारखान्यांना साखर निर्यातीसाठी परवानगी मिळाली असून वाटप झालेल्या कोट्याप्रमाणे 54 हजार 598 टन साखर निर्यात होणार आहे. स्थानिक साखर विक्रीपेक्षा निर्यात होणार्या साखरेला अधिक दर मिळणार असल्याने कारखान्यांना थोडाफार आर्थिक हातभार लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तर सांगली जिल्ह्यातील 16 पैकी 11 कारखान्यांना निर्यात साखरेला परवानगी मिळाली आहे. याशिवाय ज्या कारखान्यांनी केंद्र सरकारच्या 26 जुलै 2024 च्या आदेशाचे उल्लंधन केले आहे, त्या कारखान्यांनाही यातून वगळण्यात आले आहे. सलग तीन वर्ष हंगाम घेणार्यांची कारखान्यांना साखर निर्यातीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
निर्यात साखरेपैकी कोल्हापुरातील 21 कारखान्यांना मिळून 54 हजार 598 टन, तर सांगली जिल्ह्यातील 11 कारखान्यांना 30 हजार 385 टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 6 हजार 862 टन कोटा हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याला, तर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 3 हजार 640 टन कोटा वसंतदादा साखर कारखान्याला मिळाला आहे. यापूर्वीच्या 2 हंगामातील म्हणजे 2021-22 व 2022-23 या हंगामात उत्पादित केलेल्या एकूण साखरेच्या 3.17 टक्के साखर निर्यात करता येणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यांचा ठरवून दिलेल्या कोट्याच्या विक्रीस परवानगी दिली आहे . गेल्या 3 वर्षांत साखर हंगाम घेतलेलेच कारखाने यासाठी पात्र ठरवण्यात आले असून साखर निर्यातीमुळे थोडाफार आर्थिक हातभार या कारखान्यांना लागणार आहे.
साखर कारखाना ते निर्यातीसाठी असणारे बंदर पर्यंतचा वहातुक खर्च वजा करता स्थानिक साखर विक्री पेक्षा अतिरिक्त साखर दर मिळणार असल्याने कारखान्यांना थोडीफार अर्थिक ताकद मिळणार आहे.
कोरे-वारणा 4377, पंचगंगा-इचलकरंजी 3487, कुंभी 2494, बिद्री 3323, भोगावती 1459, दत्त-शिरोळ 4416, नलवडे-गडहिंग्लज 386, शाहू-कागल 3616, दालमिया-आसुर्ले 4133, राजाराम-बावडा 1533, आजरा-गवसे 1241, गायकवाड-सोनवडे 1576, मंडलिक-हमीदवाडा 1779, शरद-यड्राव 2313, तांबाळे 1372, हेमरस-चंदगड 2708, फराळे 517, दौलत-चंदगड 1479, जवाहर-हुपरी 6862, सरसेनापती-कापशी 2572, गुरूदत्त-टाकळीवाडी 2455.