

कोल्हापूर : शिक्षण विभागाने यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाईन केली आहे. तीन जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत आहे; मात्र अर्ज भरताना सातत्याने होत असलेल्या सर्व्हर डाऊनचा मन:स्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म संकेतस्थळावर भरले जातील की नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत. यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. प्रवेशाची वेबसाईट 26 मे पासून प्रत्यक्षात सुरू झाली. संपूर्ण राज्यातून नाव नोंदणीसाठी ही वेबसाईट वापरली जात असल्याने सर्व्हर सतत डाऊन होत आहे. विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया होते. मात्र अर्ज भरत असताना अडचणी येत आहेत. फॉर्मची फी ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी मोठे दिव्य पालकांना पार पाडावे लागत आहे. फी जमा करण्यास खूप उशीर लागत असून एक अर्ज भरण्यासाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत दोन दिवसांत जिल्ह्यातील 9 हजार 166 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.
ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा जलदगतीने नाही. यात मोबाईल डेटा महागला आहे. मुलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. शाळेतच फॉर्म भरण्याची मुभा दिली तर बरे होईल, असा सूर पालक वर्गातून व्यक्त होत आहे. शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.