

तानाजी खोत
कोल्हापूर : अत्यंत कठीण आणि अभेद्य काळ्या पाषाणातून देदीप्यमान परकोट आणि उत्तुंग बुरुज उभारणार्या वडार-पाथरवट समाजाने शतकानुशतके जपलेल्या शिल्पकलेने आता कात टाकली आहे. एकेकाळी छिन्नी-हातोड्याच्या घावावर अवलंबून असणार्या या शिल्पकलेला आधुनिक यंत्रांमुळे गती मिळाली आहे. हा व्यवसाय कोट्यवधींच्या इंडस्ट्रीमध्ये रूपांतरित झाला असून इथली शिल्पे महाराष्ट्राची शान ठरत आहेत.
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरे आजही अभेद्य बेसाल्ट दगडाच्या चिरंतन मजबुतीची साक्ष देतात. तोच प्राचीन वारसा कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर केर्लेच्या मातीत पुनरुज्जीवित झाला आहे. आंबेवाडी ते वाघबीळपर्यंत ही ‘आधुनिक पाषाणशिल्पांची पंढरी’ सजली आहे. यंत्रांच्या घरघरीने नवी लय पकडली आहे. कारागीर जेव्हा राकट दगडाला स्पर्श करतात, तेव्हा निर्जीव पाषाणातून सजीव शिल्पे आकाराला येतात. यंत्रांमुळेे पाषाणाची कठोरता आता लोण्यासारखी मृदू झाली आहे. पूर्वी मूर्ती घडवण्यासाठी पंधरा दिवस लागायचे. तेच काम आता 2-3 दिवसांत होते.
सीएनसी मशिनमुळे नक्षीकामात अचूकता आणि रेखीवता आली. दगडाचा अपव्यय टळला आहे. सुबक मूर्ती, नक्षीदार तुळशी वृंदावने, कारंजे आणि महिरपीला महाराष्ट्रभर मागणी आहे. पुणे, नाशिक, धाराशिव, तुळजापूर, पंढरपूर आणि बारामतीपर्यंत इथल्या उत्पादनांचे घाऊक विक्रेते आहेत. पुतळ्यांचे चबुतरे, स्मारकांचे सुशोभीकरण आणि राजवाडे यांसारख्या कोरीव कामांसाठी इथल्या कारागिरांना पसंती दिली जाते. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.