Kolhapur Star Bazaar | २७ कोटींचा घरफाळा थकवला; काेल्हापुरातील स्टार बाजार सील

कोल्हापूर : स्टार बाजार सील करताना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी.
कोल्हापूर : स्टार बाजार सील करताना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : तब्बल २७ कोटी रुपये घरफाळा थकबाकीपोटी घाटगे-पाटील ऑटोमोबाईल्सच्या मिळकतीतील शहरातील उड्डाण पुलाजवळ असलेल्या स्टार बाजारची इमारत कोल्हापूर महापालिकेने शुक्रवारी (दि. ३१) सील केली. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचने सील न करण्याबाबत स्थगिती आदेश दिल्याने पुढील कारवाई थांबवून सील काढण्यात आले.

स्टार बाजार इमारतीचा २७ कोटी घरफाळा थकीत आहे. त्यासाठी २०२४ मध्ये जप्तीपूर्व व बोजा नोंद करण्यासाठी महापालिकेने मिळकतधारकांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नव्हती. शुक्रवारी एक तासाची नोटीस देऊन सील करण्याची कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाकडून थकीत घरफाळा वसुलीसाठी ही कारवाई झाली. उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, चारही विभागीय कार्यालयांचे कर अधीक्षक, कनिष्ठ लिपिक तसेच परवाना विभागाचे कर्मचारी यांनी कारवाई केली.

स्टार बाजारला ६७ लाख घरफाळा असूनही फक्त ६ लाख दाखवला : भूपाल शेटे

कोल्हापूर शहरातील उड्डाण पूलाजवळ असलेल्या स्टार बाजार इमारतीला नियमानुसार वार्षिक ६७ लाख २० हजार रुपये घरफाळा लागू होतो; परंतु तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय शिवाजीराव भोसले यांनी चुकीच्या पद्धतीने वार्षिक ६ लाख २७ हजार ४९५ रुपये घरफाळा लागू करून महापालिकेचे सुमारे २७ कोटींचे आर्थिक नुकसान केले आहे, असा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

स्टार बाजारकडे २७ कोटी घरफाळा थकबाकी आहे. त्यामुळे स्टार बाजारवर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर शेटे यांनी वेळावेळी महापालिका प्रशासन, घरफाळा विभागाकडे केली होती. गुरुवारी (दि. ३०) शेटे यांनी महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर आयुक्त डॉ. भारूड यांनी घरफाळा विभागाला संबंधित मिळकत सील करण्याचे आदेश दिले.

स्टार बाजार व भोसलेंच्या मिळकतींवर बोजा चढवा

२०१९ पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. आता त्या मिळकतीला चुकीच्या पद्धतीने घरफाळा लावून सूट देणाऱ्या तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांना निलंबित करून पोलिसांत गुन्हा दाखल करावा. तसेच स्टार बाजारच्या मिळकतीवर आणि भोसले यांच्या घरावर २७ कोटींचा बोजा चढवावा, अशी मागणी शेटे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news