

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून विभक्त राहणाऱ्या पत्नीचा पतीने धारदार चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. रविवारी सकाळी पाचगावातील योगेश्वरी कॉलनी येथे ही घटना घडली. दीपाली गणेश कदम (३२) असे महिलेचे नाव असून गणेश भगवान कदम (३४) याला करवीर पोलिसांनी अटक केली. दीपालीचा मृतदेह तीन तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
मूळचा जवाहरनगर येथील गणेश पत्नी दीपाली, मुलगी स्वरा (८) व मुलगा श्री (४) यांच्यासमवेत पाचगाव येथे योगेश्वरी कॉलनीत राहतो. दहा वर्षांपूर्वी गणेश व दीपाली यांचा प्रेमविवाह झाला. काही दिवसांपासून या दोघांत वाद सुरू असल्याने दीपाली मुलांसह विभक्त राहात होती. रविवारी सकाळी गणेशने दीपालीला फोन करून घरी बोलाविले. चिडून सुरीने गणेशने तिच्या गळ्यावर वार केला. खुनानंतर गणेशने स्वत:च दीपालीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर फौजफाट्यासह दाखल झाले.