

गुडाळ:- आमजाई व्हरवडे ( ता राधानगरी ) येथे व्यावसायिक गाळ्यातील सिलिंगचे काम करताना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजेचा जोरदार धक्का बसून गंभीर झालेल्या पवन पंडित पाटील( वय 22 ) या तारळे खुर्द येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पवन हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. आमजाई व्हरवडे येथे निवृत्ती पाटील यांच्या व्यावसायिक गाळ्यात सहकाऱ्यासह सिलिंगचे काम करतेवेळी पवनला वायर ओढताना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने गंभीर झालेल्या पवनला दुचाकीवरून भोगावतीला दवाखान्यात नेत असतानाच त्याची प्रकृती चिंताजनक बनली.
नातेवाईकांनी तातडीने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच पवन मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या दुर्घटनेमुळे पवनचे कुटुंबीय, नातेवाईक, आणि मित्र मंडळींना जबरदस्त धक्का बसला.
पवन चे वडील पंडित केरबा पाटील हे सेवानिवृत्त जवान आहेत. पवनची एक बहीण विवाहित असून आई-वडिल आणि एका बहिणीसह पवन तारळे खुर्द येथे राहतो. पवनच्या आकस्मिक जाण्याने पाटील कुटुंबीयांचा आधारच गेला आहे. रात्री उशिरा पवन चा मृतदेह घरी आणल्यानंतर आई आणि दोन बहिणींनी फोडलेला टाहो ऐकून उपस्थितांना गलबलून आले. या दुर्घटनेने तारळे खुर्द गावावर शोककळा पसरली असून परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे.