

कोल्हापूर : कोल्हापुरात यंदाच्या थंडीच्या हंगामात किमान तापमान सातत्याने 14 ते 15 अंशांच्या घरात राहत असल्याने कोल्हापूरकर अक्षरशः गारठले आहेत. बुधवारी रात्रीपासून शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला असून गुरुवारी पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी अनुभवायला मिळाली. दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळनंतर अचानक वाढणारी थंडी असे चित्र शहरासह जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
शहरात बुधवारी किमान तापमान 14.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 26.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वातावरणातील बदलांमुळे थंडीचा परिणाम अधिक तीव—तेने जाणवत आहे. पुढील आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोल्हापूरचा पारा पुन्हा 14 अंशांच्या घरात घसरल्याने नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे. रात्रीपासून थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली होती. गुरुवारी पहाटे किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे थंडी अधिक बोचरी झाली. कडाक्याच्या थंडीत ऊब मिळावी यासाठी शहरात गल्लोगल्ली शेकोट्या पेटताना दिसत आहेत. तरुणांसह अबाल वृद्ध शेकोटीभोवती बसलेले दिसत आहेत. थंडी वाढल्याने स्वेटर, कानटोपी, जॅकेटस्, हातमोजे, मफलर यांची खरेदी वाढली असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. याचबरोबर चहाच्या टपर्यांवरही सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
फिल्स लाईक 13
शहरात बुधवारी रात्रीपासून बोचरे वारे, निरभ— आकाश आणि सापेक्ष आर्द्रतेत घट झाल्यामुळे थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने जाणवत आहे. हवेत ओलावा कमी आणि वार्याचा वेग वाढल्याने शरीरातून उष्णता लवकर निघून जाते. त्यामुळे प्रत्यक्ष तापमान 14.6 अंश सेल्सिअस असले तरी, नागरिकांना 13 अंशांपेक्षा कमी तापमानाची अनुभूती (फिल्स लाईक) होत आहे.