

शिरढोण : शिरोळ तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या कारभारावर पंचायत समिती शिरोळच्या चौकशी अहवालाने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विकासकामे, साहित्य खरेदी, निविदा प्रक्रिया, खर्च व प्रशासकीय मंजुरीत मोठ्या अनियमितता झाल्याचे ग्रामविकास विभागाच्या तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या निधीच्या वापराबाबत संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास अधिकारी वर्ग-२ यांनी केलेल्या तपासणीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर शासनाच्या उद्दिष्टांनुसार झालेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला-बालकल्याण, उपजीविका व अनुसूचित जाती-जमातींसाठी खर्च अपेक्षित असताना निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे स्पष्ट झाले. विकासकामांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक असताना अनेक कामे केवळ कोटेशनवर पूर्ण करण्यात आल्याचेही समोर आले.
साहित्य खरेदीतही मोठा गोंधळ आढळला. शासनाच्या नियमानुसार जीईएम पोर्टलवरून खरेदी अपेक्षित असताना ती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. खरेदी केलेल्या साहित्याची स्टॉक व डेडस्टॉक रजिस्टरमध्ये नोंद नसल्याने नेमके काय खरेदी झाले, कुठे वापरले, याचा हिशोबच उपलब्ध नाही. काही बिलांमध्ये साहित्याचा तपशील न देता केवळ एकूण रक्कम दाखविण्यात आल्याने संशय अधिक वाढला आहे.
युवक, महिला प्रशिक्षण व आरोग्य शिबिरांसाठी खर्च दाखविण्यात आला; मात्र निविदा, हजेरीपत्रक, छायाचित्रे उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद आहे. मासिक सभांचे इतिवृत्त अपूर्ण असून, खर्चास मंजुरीचे पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत अविनाश पाटील, सुरेश सासणे, सात्ताप्पा पुजारी, विश्वास बालीघाटे, विजय सूर्यवंशी,पप्पू मुंगळे यांनी पाठपुरावा केला.
जबाबदारांवर कारवाई नाही तर आमरण उपोषण
शिरढोण ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशी अहवालात अनियमितता स्पष्ट नमूद असूनही संबंधित जबाबदारांची नावे गुप्त ठेवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केला. “अहवालात भ्रष्ट कारभार सिद्ध होत असताना दोषींची नावे का नमूद केली नाहीत? जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करावी; अन्यथा कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.