

कवठेगुलंद : राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह धमाकेदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे कृष्णा नदीपलीकडील गणेशवाडीसह कवठेगुलंद परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पहिल्याच पावसाने हवेत गारवा निर्माण केला असून, मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
दुपारपर्यंत कडक ऊन पडले असतानाच अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. अनेक भागांत विजांच्या जोरदार कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक घट झाली असून सर्वत्र गारवा पसरला आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. शेतजमीन तयार करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे आणि होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून कृष्णा नदीपलीकडे सात गावात वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता.