

Herwad Gram Panchayat Records Stolen
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीतून महत्त्वाचे दप्तर गायब होऊन पुन्हा कार्यालयात परत आल्याच्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. दप्तर परत आणणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जबाबातून एका विद्यमान सदस्याचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने मात्र संबंधित सदस्याचे नाव अद्याप गोपनीय ठेवले असून, त्यामुळे गावात उत्सुकता वाढली आहे.
या संदर्भात दप्तर परत आणणाऱ्या कर्मचाऱ्याने ते एका सदस्याकडून आणल्याचे सांगितले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल शुक्रवारी दुपारी पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, गायब झालेले दप्तर हे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असून, त्यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांतील व्हाऊचर्स आणि ठेकेदारांना दिलेल्या बिलांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित सदस्याने काही व्हाऊचर्स गायब करण्याच्या उद्देशाने दप्तरच लपवले असावे, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची खातेनिहाय सखोल चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या ताब्यातील महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्याचे धाडस करणाऱ्या संबंधित सदस्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.