Kolhapur Child Death | २१ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; अपघातात गंभीर जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

वाहनाच्या धडकेत आतडी फुटल्याने मृत्यू; नदाफ कुटुंबावर कर्जाचे ओझे
Shirol Accident Minor Injured Dies
अहमद सुरज नदाफPudhari
Published on
Updated on

Shirol Accident Minor Injured Dies

दर्शन वडेर

नृसिंहवाडी : गौरवाड (ता. शिरोळ) येथील तीन वर्षीय अहमद सुरज नदाफ याची मृत्यूशी सुरू असलेली २१ दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अहमदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नदाफ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उपचारासाठी घेतलेल्या कर्जामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे.

सुरज नदाफ हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुट्टीनिमित्त त्यांची पत्नी कायनात आणि मुलगा अहमद निपाणी येथे नातेवाईकांकडे गेले होते. घरासमोरील गल्लीत खेळत असताना भरधाव दुचाकीने अहमदला जोरदार धडक दिली. अपघातानंतर बाह्य स्वरूपात गंभीर दुखापत किंवा रक्तस्त्राव दिसत नसल्याने सुरुवातीला स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करून त्याला घरी नेण्यात आले.

Shirol Accident Minor Injured Dies
Kolhapur Water Scarcity : शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचे सावट येण्याची शक्यता

मात्र दुसऱ्याच दिवशी अहमदच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने त्याला जयसिंगपूरसह पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत धडकेमुळे त्याच्या आतड्यांना गंभीर इजा झाल्याचे तसेच पोटात संसर्ग पसरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खाल्लेले अन्न व पाणी पोटात साचून त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती.

अहमदचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. मात्र वाढता संसर्ग आणि अंतर्गत जखमांमुळे त्याची प्रकृती सतत खालावत गेली. आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्याला २१ दिवस मृत्यूशी झुंज द्यावी लागली. संसर्गाच्या तीव्रतेमुळे डॉक्टरांनी त्याला पाण्याचाही थेंब देण्यास मनाई केली होती. अखेर सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अहमदची प्राणज्योत मालवली.

Shirol Accident Minor Injured Dies
Kolhapur News : सादळेत आढळला मृत गवा

एकुलत्या एक मुलाला गमावल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आक्रोशाने परिसरातील नागरिकही हळहळले.

नदाफ कुटुंबावर कर्जाचे संकट

अहमदच्या उपचारासाठी मोठा खर्च झाला. गौरवाड ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला, तर काही रक्कम उसनवारी करून नदाफ कुटुंबाने रुग्णालयाचा खर्च भागवला. मुलाच्या निधनाचे दुःख आणि उपचारासाठी घेतलेल्या कर्जाचे ओझे अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला आता समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news