

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी इतर जिल्ह्यात होणारे भूसंपादन आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवातीस होणाराचा विरोध यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून जाणार की नाही याबाबत संभ—मावस्था होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलेल्या जाहीर वक्तव्याने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामास हिरवा कंदील मिळाला आहे. या नव्या महामार्गामुळे नागपूर-गोवा 21 तासांचा प्रवास 11 तासांवर येणार आहे. रस्ते विकास महामंडळातर्फे शक्तिपीठ महामार्गाची अलाईनमेंट निश्चित केले आहे. 805 कि.मी. लांबीचा हा महामार्ग आहे.
रस्त्याच्या दर्जासोबतच रस्त्यांचा देखभाल व दुरुस्ती खर्च शून्य होण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जाऊन पुढील 30 ते 40 वर्षे रस्त्यांच्या कामावरील खर्चास आळा बसणार आहे.शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग पत्रादेवीमार्गे (गोवा), गोवा-महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. या महामार्गाची लांबी 802 किलोमीटर असून भूसंपादनासह खर्च 86 हजार 600 कोटी रुपये येणार आहे. सुमारे 9 हजार 385 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे पर्यटन, दळणवळण आणि औद्योगिक विकास गतिमान होऊन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे विभाग एकमेकांना जोडले जाऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
राज्यातील 19 तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडणार्या या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शजक्तपीठासह आंबेजोगाई, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर तसेच कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाचीवाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत. बारा जिल्ह्यांतून या महामार्गास शेतकर्यांनी विरोध केला आहे. कोल्हापुरातूनही महामार्ग विरोधी संघर्ष समितीने विरोध केला आहे. सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या महामार्गासाठी शेतकर्यांना अधिक मोबदला देऊन भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापुरातून होणारा विरोध पाहता हा महामार्ग कोल्हापुरातून जाणार की नाही याबाबत संभ—मावस्था होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सोमवारी या महामार्गास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांचे संमती असल्याचे सांगिल्याने ‘शक्तिपीठ’ कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना विश्वासात घेऊन शक्तिपीठबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे या महामार्गाबाबत काहीही अडचण येणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
नागपूर-गोवा 805 कि.मी. अंतर, एकूण खर्च 86 हजार 600 कोटी, 12 जिल्हे, 37 तालुक्यांतील 368 गावांतील 12 हजार 889 गटांतील 27 हजार 500 एकर भूसंपादन होणार.महामार्गावर 48 मोठे पूल, 28 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग, 3 ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे, 386 गावांतील नैसर्गिक संपत्ती नष्ट होणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील कोथळी येथून सुरू होऊन शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड आणि आजरा या सहा तालुक्यांतून जाणार आहे. तर शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर दक्षिण, कागल आणि राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव पडणार आहे. कोथळी, निमशिरगाव, हातकणंगले, माणगाव, पट्टणकोडोली, कणेरी, व्हन्नूर, एकोंडी, सिद्धनेर्ली, निढोरी, गारगोटी, शेळप, आंबोली, गेळेमार्गे पत्रादेवी येथून जणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शक्तिपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तिपीठांसह औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, आदमापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणार आहे.