

Shirale Warun Farmer Compensation Issue
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शिराळे–वारुण येथील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर यांच्यावर २९ डिसेंबर रोजी रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटावर खोल जखमा झाल्या. इतकेच नव्हे तर पोटातील आतडी बाहेर येईपर्यंतची गंभीर अवस्था निर्माण झाली होती. तातडीने त्यांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आठ ते दहा दिवस उपचार घेतल्यानंतर पोटावर मोठी शस्त्रक्रिया करून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, सध्या त्यांच्या कुटुंबासमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. उपचारासाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे बिल झाले असून, वनविभागाकडून केवळ एक लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम भरताना पत्नीचे सौभाग्य अलंकार गहाण ठेवावे लागले असून नातेवाईक व पाहुण्यांकडून उसनवारी करावी लागली आहे.
वनविभागाकडून उर्वरित आर्थिक मदत मिळण्यास मात्र कायदेशीर अडचणींचे कारण पुढे केले जात असल्याने पीडित कुटुंबाला आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. रानगव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवाजी चिंचोलकर यांच्या कुटुंबासमोर सध्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
घरातील कर्ता, कमावता पुरुष अंथरुणाला खिळून पडल्याने संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती डबघाईला आली आहे. वनविभागाकडून संपूर्ण आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे हे कुटुंब आशेने पाहत आहे.
जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात कोणी जखमी झाल्यास संबंधित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांना मानसिक आधार देणे व तातडीने नुकसानभरपाई देणे, हे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र प्रत्यक्षात शासनाच्या नियमांच्या अडथळ्यांमुळे पीडितांना वेळेवर मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.