

Shahuwadi Seven Haystacks Burnt
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील लाळेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सात शेतकऱ्यांच्या वैरणीच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. लाळेवाडी परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणग्या शेजारीच असलेल्या वैरणीच्या गंजीवर पडल्या. हवा खेळती असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. एकामागून एक अशा एकूण सात शेतकऱ्यांच्या गंजी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
आगीची भीषणता पाहून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मलकापूर नगरपरिषद येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीमध्ये सात शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या साठवलेल्या वैरणीचे राखेत रूपांतर झाले आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.