

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील साळशी, सुपात्रे, वरेवाडी आणि हणमंतवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांवर वन्यजीवांचे वारंवार हल्ले होत आहेत. दरम्यान, काल रात्री बिबट्याने साळशी येथील एका रेड्यावर हल्ला करून त्याला आपले भक्ष्य केले.
साळशी येथील रहिवासी हिंदुराव शामराव मेथे यांचे 'खड्यांचा माळ' परिसरात जनावरांचे शेड आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली जनावरे या शेडमध्ये बांधली होती. काल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने शेडमध्ये घुसून १ वर्षाच्या रेड्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याला जागीच ठार मारून फस्त केले. आज सकाळी हिंदुराव मेथे शेडकडे गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
साळशी आणि लगतच्या सुपात्रे, वरेवाडी, हणमंतवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांत शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आणि बैलांवर बिबट्या तसेच इतर हिंस्र प्राण्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. डुकरांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असली, तरी बिबट्याचा वावर आणि वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा घराबाहेर पडणेही आता धोकादायक ठरत आहे.
परिसरात वारंवार पाळीव जनावरांवर हल्ले होत असतानाही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, रात्रीच्या वेळी वन विभागाची गस्त वाढवावी आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.