मध्य रेल्वेचे दक्षिणेकडील सर्वात महत्त्वाचे रेल्वेस्थानक म्हणजे कोल्हापूर; मात्र अखेरचे स्थानक असल्याने ते सातत्याने दुर्लक्षितच राहिले. लोकप्रतिनिधींचा वचक नाही आणि अधिकार्यांचे लक्ष नाही, यामुळे सोयी-सुविधांचा अक्षरश: फज्जा उडत आहे. केंद्र शासनाच्या अमृत भारत रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनेेंतर्गत तब्बल 42 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा कायापालट केला जाणार आहे, असे सांगितले जाते. त्यानुसार कामेही होत आहेत; मात्र पायाभूत सुविधा ‘जैसे थे’च आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसचा दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर शेवाळ उगवले आहे. यावरूनच प्रवाशांना ये-जा करावी लागते. फ्लॅटफॉर्म ठिकठिकाणी उखडल्यामुळे रेल्वेच्या बांधकामा बाबत सवाल उपस्थित होत आहेत.
प्लॅटफॉर्म क्रमांक चार हा नव्याने निर्माण केला. प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनचे विस्तारीकरण केल. दोन वर्षांपूर्वी हे काम झाले; मात्र ते खरेच दर्जेदार झाले का, असा सवाल आहे. प्लॅटफॉर्मशेजारी रेल्वेचीच सुमारे 30 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ते सर्व पाणी प्लॅटफॉर्मवर येते. यासह फ्लॅटफॉर्मवर एका भिंतीतून झर्यासारखे पाणी येते. यामुळे प्लॅटफॉर्मवर अक्षरश: शेवाळ आले आहे. शेवाळ साचलेल्या पाण्यातूनच प्रवाशांना साहित्यासह वाट काढताना कसरत करावी लागत आहे.
नव्याने प्लॅटफॉर्म उभारताना रेल्वेची जुनी टाकी हटवण्यात येणार होती. त्याकरिता जमिनीत नवी टाकी बांधली आहे, तरीही जुनी टाकी वापरात आहे. या टाकीला गळती लागलीच आहे. शिवाय त्याच्या पिलरसह ठिकठिकाणी सिमेंट उखडून आतील सळ्या दिसत आहेत. यामुळे ही टाकी धोकादायक असल्याचे स्पष्ट आहे. या टाकीखालून प्रवाशांची ये-जा सुरू असते. हा सर्व प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जीवाशीच खेळ सुरू असल्यासारखाच आहे.
अधिकारी करतात काय?
काही तांत्रिक अडचणी असू शकतात, गळती निघत नसेलही म्हणून काहीच उपाय योजना करू नये, हे कुठले शहाणपण आहे. गल्लेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी नेमके करतात काय? हे शेवाळ काढून, गळतीमुळे येणार्या पाण्याला किमान योग्य वाट करून देऊन हा प्लॅटफॉर्म सुस्थितीत ठेवता येतो; पण तसे होत नाही. काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी पाहणी केली. त्यांना ही गोष्ट दिसली नाही का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.