

यड्राव : शहापूर चौकातून जीकेनगरकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकीने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यात सहा ते सात वाहनांना धडक देत विद्युत ट्रान्स्फॉर्मरला जाऊन चारचाकी वाहन धडकले. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची ही थरारक घटना मंगळवारी दुपारी घडली.
चारचाकी (एमएच 51 ए 4037) हे शहापूरकडून जीकेनगरकडे जात होते. वाहनावरील ताबा सुटल्यामुळे वाहन रस्ता दुभाजकाला धडकले. तसेच रिक्षा (एमएच 09 सीडब्ल्यू 1039) ला धडक दिली. ही रिक्षा समोरच असणाऱ्या चिंतामणी बेकरीमध्ये घुसली. यामध्ये अनिल देवकरे जखमी झाले. त्यानंतर वाहनाने बाजूस असलेल्या सहा ते सात वाहनांचे नुकसान केले. जवळच असणाऱ्या महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरला जोराची धडक दिली. त्यामुळे सर्व नागरिक घाबरून रस्त्यावर आले. यात तिघेजण जखमी झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट देऊन पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. पंचनामा करून वाहनासह चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.