

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाकडून मंजूर असलेली मासिक पेन्शन योजना ही सन्मानाने सन्मानधन म्हणून मिळावी या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या भागातील ज्येष्ठ नागरिक व वारकऱ्यांनी मंगळवारी अंबाबाईचरणी सन्मानवारी काढली.
राज्य प्रशासनाला लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या सन्मानधन मागणीसाठी श्री अंबाबाई चरणी हजारो स्वाक्षरीपत्रांद्वारे देवीला साकडे घालण्यात आले. अर्थक्रांती जीवनगौरव अभियान अंतर्गत श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच कोल्हापूर यांच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक महिला वारकरी संप्रदाय टाळ-मृदंगांच्या निनादांमध्ये गांधी मैदान पद्माराजे हायस्कूल, खरी कॉर्नर या मार्गावरून सन्मान वारी काढण्यात आली. या सन्मान वारीमध्ये रथातून साक्षात श्री अंबाबाई रूपामध्ये असलेल्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ज्येष्ठ नागरिक यांच्या सन्मानाच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यव्यापी ज्येष्ठ नागरिकांचा आंदोलन स्वरूपात निर्णय घेतला जाईल, असे मुख्य राज्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक देशासाठी महत्त्वाचा आहे. आजपर्यंतच्या वयाच्या 65 पर्यंत देशासाठी दिलेले योगदान हे मोलाचे असून त्यांना सुख सोयी, सुविधा देणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे मत अर्थक्रांती जीवन गौरव अभियान कोल्हापूर जिल्ह्याचे माहिती व प्रसिद्धी प्रमुख संतोष पांचाळ यांनी मांडले.