

कोल्हापूर : संचमान्यतेचा अन्यायकारक आदेश, शिक्षकेतर कर्मचार्यांची प्रणालीद्वारे नेमणूक या राज्य सरकारच्या अन्यायी निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि. 11) जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय संस्थाचालकांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आ. जयंत आसगावकर, माजी आ. भगवानराव साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे अध्यक्षस्थानी होते.
आ. आसगावकर म्हणाले, सध्या राज्यात शिक्षकांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. पवित्र पोर्टलमुळे संस्थाचालकांचे सगळे अधिकार संपुष्टात आले आहेत. हे अधिकार कायम ठेवायचे असतील तर एकजूट व जनजागृती आवश्यक आहे. शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, शासनाच्या धोरणाविरुद्ध विविध शैक्षणिक संघटना एकत्रित लढा देणार आहोत.
प्राचार्य साळुंखे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील सगळे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी विठ्ठलाने सरकारला द्यावी. शिक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापुरातून आवाज उठवला आहे, पण हा आवाज राज्यभर जाणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, वाय. डी. माने शिक्षण संस्थेचे भैया माने, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, खंडेराव जगदाळे, डी. एस. घुगरे यांनी मनोगत व्यक्त केले. कौस्तुभ गावडे यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे बी. जी. बोराडे, प्राचार्य डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते. न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी आभार मानले.
संस्थाचालक व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समितीत प्रत्येक संघटनेचे प्रतिनिधी असतील. समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल असे ठरले. दरम्यान, अंशत: विनाअनुदानित शाळांनी 8 व 9 जुलैला शाळा बंद पुकारला आहे. यास शैक्षणिक व्यासपीठ विविध शैक्षणिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनात अनुदानित शाळांमधील प्रत्येकी दोन प्रतिनिधी आझाद मैदानावर पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला.