

अरविंद पाटील
धामोड : राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना १५ एप्रिलपर्यंत शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) भरण्यास मुदत देण्यात आली आहे . परंतु नुकत्याच १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. या व्यतिरिक्त ५ वी ते ९ वी व ११ वीच्या परीक्षा सुरु आहेत, काही ठिकाणी सुरु होणार आहेत. तसेच या परीक्षेच्या अनुषंगाने विविध कामे पूर्ण करण्याचे काम शाळांमध्ये सुरू आहे.
"6 क्षेत्रे, 128 मानके, 100 पेक्षा जास्त फोटो"
स्कॉफसाठी 6 क्षेत्रे, 128 मानके आहेत तर 100 पेक्षा जास्त फोटो आणि संबंधित माहिती लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे. परंतु इतके फोटो शोधण्यासाठी सर्व शिक्षकांची डोकेदुखी आणि धावपळ उडाली असून मुलांचा अभ्यास आणि शिक्षणावर याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची महत्त्वपूर्ण माहिती भरण्यास हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून करण्यात येत आहे.
मूल्यांकनाची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि किचकट आहे. तरीही ती करण्यास कोणत्याही शिक्षकाची हरकत नाही. एकीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे नियोजन, इतर प्रशिक्षण यात दोन महिने कालावधी गेला. शिवाय मासिक कामे, या व्यतिरिक्त ५ वी ते ९ वी व ११ वी चा अभ्यासक्रम पूर्ण करणे यास वेळ लागतो. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विविध कामे पूर्ण करण्याचे काम शाळांमध्ये सुरू आहे. शिक्षण विभागाला योग्य, अचूक पडताळणी करायची असेल तर विभागाने वेळ देणे अपेक्षित आहे.
- शिवाजी कुरणे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा विनानुदानित शाळा कृती समिती