

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा कोल्हापूरचा डंका वाजला आहे. जिल्ह्याने दोन्ही शिष्यवृत्तीत पहिल्या पाचमध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर उमटवली.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २२ फेब्रवारी रोजी पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातून पाचवीसाठी २९ हजार तर आठवीला १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गुरुवारी सायंकाळी अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाला. पाचवी-ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सेंट्रल स्कूल, गंगापूर- सुवर्णश्री महादेव पाटीलने (९६.६६) गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. विद्यामंदिर हणबरवाडीचा राजवीर तुषार पाटील (९५.३३), विद्यामंदिर नांदवडे-अथर्व राजेश पाटीलने (९५.३३) अनुक्रमे चौथा क्रमांक मिळवला. मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुनगरची जान्हवी दादासाहेब वडगुलेने ९४ टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला.
राज्यस्तरीय पाचवी-शहर गुणवत्ता यादीत लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमधील स्वरांगिनी विजय केंद्रेने ९६ टक्के संपादन करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. स्वराली दिलीप कदमने ९४.६७ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला. छत्रपती शिवाजी विद्यालय, गहडिंग्लजच्या प्रसन्न महेंद्र पंडितने ९४ टक्के संपादन करीत सातवा क्रमांक तर नेहरुनगर हायस्कूलचा श्री किशोर शिंदे ९३.३३, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचा तेजस सुशांत कासोटे ९२.६६ टक्के गुण संपादन करीत नववा क्रमांक मिळवला.
राज्यस्तरीय आठवी - ग्रामीण गुणवत्ता यादीत पी. बी. पाटील हायस्कूलचा सक्षम शरद नारिंगकर ९५.३३ टक्के गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला. उत्तूर विद्यालय अँड ज्यु. कॉलेजची, उत्तूरची बुशरा शहनवाज मुल्ला (९४.६६) व महात्मा गांधी विद्यालय, बांबवडेची समृद्धी रमेश पाटील (९४.६६) यांनी अनुक्रमे पाचवा क्रमांक मिळवला. आठवी - शहर गुणवत्ता यादीत म.ल.ग. हायस्कूलची पूर्वा प्रवीण भालेकर ९६.६६ टक्के तर शां. कृ. पंत वालावकर हायस्कूलचा अथर्व सागर वाडकरने ९६.६६ टक्के गुण संपादन करून अनुक्रमे राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. डी.के.टी.ई इचलकरंजी हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजचा विश्वजित महेश विभुते, सौ. विजयमाला डी. शिंदे हायस्कूलचा राजवर्धन शैलेंद्र पाटीलने ९६ टक्के गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. जागृती हायस्कूल सेंकडरी स्कूलचा ऋतुराज प्रकाश येसारेने ९५.३३ टक्के गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला.
लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा दबदबा
लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा शिष्यवृती परीक्षेत दबदबा कायम राहिला आहे. यंदाही पाचवी शहर गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये तीन विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपणच शिष्यवृत्तीत अव्वल असल्याचे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.