

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान अपहारप्रकरणी विशेष तपास पथकाच्या चौकशीत स्थानिक एजंटस्ना हाताशी धरून देवस्थानच्या पार्किंगसाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात ११ कोटी ५६ लाखांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या एजंटांच्या बँक खात्यांचे तपशील तपासल्यानंतर आणखी माहिती उघड होत आहे. परिसरातील काही एजंटांनी शेतकऱ्यांकडून पार्किंगसाठी २ लाख रुपयांना खरेदी केलेली जमीन आठ दिवसांत अडीच कोटींना देवस्थानला विकल्याचे समोर आले.
संत बाळूमामा देवस्थानमध्ये मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत मेंढ्यांची विक्री व जमीन खरेदीत ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिणी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एजंट डॉ. भीष्म सूर्यवंशी, सागर शिंदे, प्रकाश मांगले, रणजितसिंह सूर्यवंशी, तन्मय बाचणकर यांना अटक केली आहे.
खरेदी केलेल्या दिवशीच विक्री
सहधर्मादाय आयुक्तांनाही अंधारात ठेवून स्थानिक एजंटांना हाताशी धरून केलेले ११ कोटी ५६ लाखांचे व्यवहार चौकशीच्या केंद्रस्थानी आले आहेत. खरेदी आणि विक्रीचे व्यवहार एकाच दिवशी किंवा आठ दिवसांच्या अंतराने झाले आहेत. आठ दिवसांतच जमिनीचे भाव कोट्यवधी रुपये दाखवल्याने तपास पथकही चक्रावले आहे.