

जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील क्र. 166 च्या चोकाक-अंकली दरम्यानच्या 11 गावांतील बाधितांना चौपट भरपाईची रक्कम देण्याचा निर्णय झाल्यानंतर फक्त 6 दिवसांत या गावातील गटांची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. एकूण क्षेत्र, बाधित होणारे शेतकरी, खातेदार यांची सविस्तर माहिती असलेला अहवाल आठवडाभरात सक्षम प्राधिकारी, महामार्ग प्राधिकरण व भूसंपादन विभागाला दिला जाणार आहे. त्यानुसार आदेश होऊन बाधितांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जाणार आहे.
हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तर शिरोळ तालुक्यातील तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उमळवाड, उदगाव व मिरज तालुक्यातील अंकली या गावातील मोजणीचे काम रखडले होते. येथील शेतकरी दोन वर्षांपासून चौपट भरपाईसाठी आंदोलन करीत होते. अखेर दोन वर्षांच्या लढ्यानंतर आठवडापूर्वी राज्य शासनाने चारपट नुकसान भरपाईचा निर्णय दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 6 दिवसांत बाधित होणार्या जमिनींची मोजणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या मोजणीसाठी हातकणंगलेमध्ये सात, तर शिरोळमध्ये सात टीम करण्यात आल्या होत्या. या टीमने मोजणी पूर्ण केली आहे. त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र किती असेल, याची नेमकी आकडेवारी समजेल.
नकाशासह संयुक्त भूसंपादन मोजणी अहवाल यासह कृषी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्वच्छता व पाणीपुरवठा अशा विविध विभागांचेही अहवाल तयार केले जातील. हे अहवाल भूसंपादन क्रमांक 12, महामार्ग प्राधिकरण यांना दिले जातील. सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल. यात हातकणंगले तालुक्यातील 185 गट व 90 सिटी सर्व्हे नंबर, तर शिरोळ तालुक्यातील 260 गट, जैनापूर गावठाण परिसर यांचा समावेश आहे. आठवडाभरात मोजणी अहवाल सक्षम प्राधिकारी यांना सादर केला करणार असल्याचे उपअधीक्षक भूमिअभिलेख जयदीप शितोळे यांनी सांगितले.
तप्तरतेने मोजणीचा डोंगर पार : शासनाने चौपट भरपाईचा निर्णय घेताच जिल्हाधिकारी येडगे यांनी तत्परतेने मोजणीचे आदेश दिले होते. हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील 7 पथकांनी 11 गावांतील बाधित क्षेत्राची मोजणी पूर्ण केली.
445 गट आणि गावठाण क्षेत्राचा समावेश : या मोजणी प्रक्रियेत हातकणंगले तालुक्यातील 185 गट व 90 सिटी सर्व्हे नंबर, शिरोळमधील 260 गटांचा समावेश आहे. यामुळे नेमके खातेदार किती आहेत, याची माहिती मिळणार आहे.
मल्टिपल विभागांचा अहवाल संकलित होणार : केवळ जमिनीच्या मोजणीनंतर जमिनीवरील झाडे, विहिरी, बांधकामे आणि पाईपलाईन यांचे मूल्यांकन करून हा अहवाल भूसंपादन क्र. 12 व महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द केला जाईल.
आठवडाभरात भरपाई : मोजणीचा अहवाल सक्षम प्राधिकार्यांकडे सादर केला जाईल. त्यानंतर तत्काळ आदेश निघून बाधितांच्या बँक खात्यात भरपाई जमा होणार असल्याची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले.