

सुनील सकटे
कोल्हापूर : विविध कारणांनी गेली अनेक वर्षे रखडलेल्या कोल्हापूर - सांगली रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे जुनी निविदा रद्द करून 33 कि.मी. रस्त्यासाठी 937 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार नवीन निविदा जाहीर करण्यात आली आहे. सहा एप्रिलपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आणखी काही काळ चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील सांगली फाटा ते अंकली या टप्प्याच्या चौपदरीकरणाची रस्ते विकास प्रकल्पाची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तर्फे नुकतीच रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचा मुद्दा गेले काही वर्षे चर्चेत आहे. या मार्गावर दैनंदिन वाहतुकीत वाढ होत आहे. चौपदरीकरण होणार असल्यामुळे गेली अनेक वर्षे केवळ डागडुजीचेच काम करण्यात आले आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. जुन्या ठेकेदाराची निविदा रद्द करून 17 फेबुवारी रोजी नव्याने निविदा काढली आहे.
सांगली फाटा ते चोकाक हा 7.738 किलोमीटर आणि चोकाक (किलोमीटर 145.300) ते अंकली (किलोमीटर 171.171) अशा दोन टप्प्यांतील एकूण 33.609 किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे नियोजन आहे. हा प्रकल्प हायबिड ॲन्युटी मोड अंतर्गत (एचएएम) अंतर्गत राबवला जाणार आहे. 17 फेबुवारी रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहा एप्रिल 2026 पर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. सात एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता तांत्रिक बीड ओपन केले जाणार आहे. त्यानंतर फायनान्शियल बीड प्रक्रीया होऊन ठेकेदाराची निवड केली जाणार आहे.